II देवांच्या अवताराची कहाणी II
बुवा सांगत आपल्याच देशात लय युगं आले,
हरेक युगांत देवादिकांचे अवतारं खुप झाले (धृ)
विष्णुन तर म्हणे कधी संपच नाही केला;
प्रत्येक युगांत एक तरी अवतार त्याचा झाला,
असं म्हणून बुवा आपले पुराणात गेले (1)
कच्छ,मच्छ,वराह झाला म्हणे कधी झाला नरसिंह;
तोंड होतं सिंहाचं म्हणे माणसाचा त्याचा देह,
मग प्रश्न पडला नरसिंहाचे शेपूट कोणी नेले? (2)
परशुराम,राम,मोहिनी कधी झाला किशन;
बायकांना छेडण्याचं फक्त त्याच मिशन,
कळे नाही सोळासहस्त्र बायकांचे त्याने रेकाॅर्ड कसे केले? (3)
आता म्हणे अवतार त्याचा सुरु आहे कली;
जो चालेल ईमानानं त्याचाच जाईल बली,
बेईमानांना सांभाळण्याचे काम आता कलीवरती आले. (4)
कलीपायीच म्हणे हे खूनखराबे होतात;
म्हणून लोकं भीतात अन् देवळामंधी जातात,
पण शस्त्रांपासून देवांचेही हात होत नाही वाले. (5)
सगळं ऐकून माझा पारा आधीच खूप चढला;
उकरुन त्यात मुद्दा बुवानं ब्रम्हदेवाचा काढला,
म्हणे ब्रम्हदेवानं तर मायबापहो हे जग निर्माण केले. (6)
कथा त्याची ऐकतांना एक बाब ध्यानात आली;
की, ब्रम्हदेवाला गर्भधारणा कोणापासून झाली?
पण ऐकावं आधी म्हणल मग कराव बुवाला खुले. (7)
बुवा सांगे ब्रम्हदेव म्हणजे सृष्टीची माय;
त्या देवाची कहाणी लय अजब गजब हाय,
कुत्र्यावाणी म्हणे त्याले चार पिल्लं झाले.(8)
पुढे सांगे बुवा म्हणे ब्रम्हदेव व्याला;
ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र या चौघांची माय झाला,
कळत नव्हतं ब्रम्हानं बाईचे कसबचं कसे केले? (9)
वैश्य निघाला मांडीतून म्हणे क्षत्रिय निघाला दंडातून;
शुद्र निघाला पायातून तर ब्राम्हण निघाला तोंडातून,
चार ठिकाणी जननद्वारं ब्रम्हाला कसे आले? (10)
पुन्हा एक प्रश्न मग ऐरणीवरती आला;
विचार करत होतो ब्रम्हानं नवरा कधी केला?
विचारलं जेव्हा याबद्दल कोणीच नाही बोले.(11)
एकच मुल देतांना माय देते किती कळा;
चार जंदताना ब्रम्हाने कुठे शिंपला रक्ताचा सळा(सडा),
नऊ महिण्याचे डोहाळे याचे पुरे कोणी केले? (12)
विचार करता करता एक अजून ध्यानात आलं; की गर्भपिशवीचं रोपणं ब्रम्हाच्या उदरात कोणी केलं?
टेस्ट ट्यूब बेबीचे तेव्हा टेक्निक नव्हते आले. (13)
स्त्रियांसारखा मासिक धर्म आधी ब्रम्हालाही आला;
म्हणूनच ब्रम्हदेव गर्भवती झाला,
अरे सव्वा महिण्याचे पत्थ्य कसे यानं केले? (14)
अरे तंत्रज्ञानाचा मित्रहो काळ एवढा आला;
पण अजूनही हिजडा मायबाप नाही झाला,
मग ब्रम्हालाच जंदायचे(व्यायचे)टेक्निक कसे आले? (15)
आपल्या देशांतच देवांचे अवतारचं कसे झाले?
No comments:
Post a Comment