आम्ही कोण ?????
.
.
.
.
.
बौद्ध धम्म स्वीकारून आज आपल्याला जवळपास साठ वर्ष झाले. या साठ वर्षात आमची एक पीढ़ी मातीत गेली. 1956 साली ज्याचा जन्म झाला आज तोही मोडकळीस आला.
मानवाच्या जीवनात साठ वर्ष म्हणजे पूर्ण आयुष्यच.
मंग माझा प्रश्न तमाम माझ्या बौद्ध बांधवांना आहे,
या साठ वर्षात आपण बौद्ध धम्म आत्मसात केला का ?
याचे उत्तर मला "नाही "हेच मिळेल.
पण, का नाही ?
बौद्ध धम्म आपल्या मेंदूपर्यंत पोचवण्या नेमके कमी कोण पडले ?
जर तुमचे उत्तर "हो " आहे तर, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या !
का आपल्यावर उच्च जातीच्या हिंदू लोकांचे आजही हल्ले होतात ?
का आपल्याला आजही दलितच संबोधतात ?
का आपल्याला आजही काही उच्चवर्णी महार म्हणून हिणवतात ?
जर एखाद्या दलित हिंदू व्यक्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्यावर आपल्यासारखा अन्याय होतो का ?
मुळीच नाही !
मंग आपल्यावरच का ?
जर एखाद्यानी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर तो तन मन धनाने तो धर्म अंगी कारतो.त्याच्या गळ्यात, खिशात, घरात, दारात त्या त्या धर्मगुरुचेच फोटो दिसतील. धर्मांतर केल्यानंतर त्यानी अगोदरच्या धर्माला पूर्णतः सोडलेले असते.
जर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर तो नियमित मस्ज़िदला जाणार व त्या धर्माचे काटेकोरपणे पालन करणार.
जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर तो नियमित चर्च मधे जाऊन प्रार्थना करणार व धर्माचे पालन करणार.
मंग मला प्रश्न असा उद्भवतो, आपण धर्मांतर करून बौद्ध झालो.
काय आपण बौद्ध तत्वाचे पालन करतो ?
बौद्ध धम्मासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करतो ?
1956 साली आपण हिंदू धर्म जरूर सोडला पण हिंदू धर्माचे देव, सण,चालीरीती मात्र सोडल्या नाही.
ज्या मंदिरात आपल्याला प्रवेश नाही त्या मंदिरात आपण बाहेरून हात जोडून दर्शन घेतो पण विहारात कधी ढुंकूनही बघत नाही.
कुणी आपल्याला कुलदैवत विचारले तर आपण खंडोबा सांगतो.
दसरा,दिवाळी,होळी,पंचमी,रक्षाबंधन सारे सण न चुकता धुमधडाक्यात साजरे करतो.
शिर्डी शेगांवच्या देवस्थानात जास्त आम्हींच गर्दी करतो.
मंग आम्ही कोण ?
बौद्ध की महार ?
जर आपण बौद्ध धम्माचे तत्व न पाळता हिंदू धर्माचेच तत्व पाळत असणार तर आपल्याला उच्च वर्णी हिंदू दिन दलित मागासलेला महार समजणारच व आपल्यावर पूर्वीसारखाच अन्याय अत्याचार करणार.
हिंदू धर्मातील कित्येकानी पूर्वी मुस्लिम व ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मंग त्यांच्यावर का उच्च हिंदू अन्याय अत्याचार करीत नाहीत.
कारण ते आता हिंदू नाहीच !
त्यांचा देव वेगळा आहे.धर्म वेगळा आहे. सण वेगळा आहे.कुलदैवत वेगळे आहे.
जर ते हिंदू नाहीत तर उच्च नीच लेखण्याचे काहीएक कारण नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, आपल्या समाजाला नुसते नामांतर करून काहीही फायदा होणार नाही. आपल्याला जर शूद्र नावाची घाण आपल्यातून उखाडून फेकायची असेल तर आपल्याला धर्मांतर शिवाय गत्यंतर नाही.
ते आपल्या भाषणात हिंदूतून धर्मांतर केलेल्या काही जातीचे पुरावेही दाखवत होते.एका शूद्र जातीतील जेंव्हा ते हिंदू होते तेंव्हा त्यांना गावातल्या विहीरीत सवर्णा बरोबर पाणी भरण्या मनाई होती पण त्यानी धर्मांतर केल्यावर त्यांना आपोआप त्या विहिरीवर पाणी भरण्याचा अधिकार मिळाला.
ही आहे धर्मांतराची ताकत. मंग ती अध्यापही आपल्याला का लागू झाली नाही. आजही खेड्यापाड्यात आमच्या बांधवाना गावात उच्च वर्णाच्या विहीरीवर पाणी भरण्यास मनाई आहे.
आजही आम्हांला गावात खालचा दर्जा आहे.
याचे कारण एकच, आपण बौद्ध धम्म स्वीकारला पण अंगीकारला नाही.
त्यामुळे सवर्णाला आजही आम्ही महारच दिसतो.
जो पर्यंत तुम्ही बौद्ध धम्माचे तत्व व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अंगीकारत नाही. तो पर्यंत तुम्हांला बौद्ध म्हणून सांगण्याचा अधिकारच नाही.
No comments:
Post a Comment