Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, January 1, 2016

फडणवीस आणि ढोंगी पुरोगामी

फडणवीस आणि ढोंगी पुरोगामी

- विजय चोरमारे,December 31

कोणतीही व्यक्ती 'आपल्या' माणसात आली की जरा मोकळी ढाकळी होते. औपचारिकता बाजूला ठेवून बोलण्यात मोकळेपणा येतो. मोठ्या पदावरील व्यक्ती असेल तर काहीकाळ पदाचा विसर पडतो. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच होत असावे बहुधा. मुंबईच्या कमालीच्या उकाड्यातही जाकिट घातल्यामुळे गुदमरत असणार. परंतु नागपूरला रास्वसंघाच्या दसरा मेळाव्यात संघाची हाफपँट घातल्यावर मोकळे मोकळे वाटत असणार. अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मिळणारा सन्मान हवाहवासा वाटत असला तरी विदर्भवाद्यांच्या बैठकीत त्यांना जरा आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांमध्ये आल्यासारखे वाटत असणार. असाच त्यांचा आणखी एक परिवार म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. अलीकडेच अभाविपचे सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित राहिले. कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामुळे अभाविपमधील मंतरलेले दिवस जिवंतपणे अनुभवायला मिळाले, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविली. ते स्वाभाविकही आहे म्हणा. त्यांनी कोणत्या कार्यक्रमांना जावे, कुणासोबत ऊठबस करावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जी जबाबदारी येते, त्या जबाबदारीने त्यांनी बोलावे, अशी अपेक्षा बाळगली तर ती चुकीची ठरू नये.

प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार अभाविपच्या अधिवेशनात त्यांनी भाषणाचा जो सूर लावला, तो जरा काळजी वाढवणारा होता. ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार 'समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे लागेल.'

इंग्रजांनी पुरोगामी व आधुनिकतेचे चित्र निर्माण केले. तर, स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी, प्रतिगामी अशी लेबले चिकटवून समाजात अपसमज निर्माण केल्याची टीका त्यांनी केली. ज्यांना समाजकारण व राजकारणात स्वत:चे प्रभुत्व आणि तरुण नेतृत्व निर्माण करता आले नाही, अशांनी काही क्षेत्रातील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरविण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून, या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते.' असेही फडणवीस यांना वाटते.

अर्थात फडणवीस यांना काय वाटावे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु जे फडणवीस यांना वाटते, तेच जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते चिंताजनक म्हणावे लागेल. कारण त्यांनी थेट पुरोगामी विचारधारेवर हल्ला केला आहे. पुरोगामी विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या लोकांची ढोंगी म्हणून संभावना केली आहे. आतापर्यंत रास्व संघ, सनातन, विश्वहिंदू परिषदेचे नेते-प्रवक्ते पुरोगाम्यांना ढोंगी म्हणत होते. आता तीच भाषा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वापरत आहेत.

गेल्या दोन वर्षांतील महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या वक्तव्यांकडे पाहताना त्यातील 'बिट्विन द लाइन्सही' पाहाव्या लागतात. त्यांच्या मतानुसार संघाचे विचार, अभाविपचे विचार, भाजपचे विचार हे राष्ट्रवादी विचार आहेत. या विचारांवर टीका करणारे सगळे ढोंगी पुरोगामी आहेत. त्याअर्थाने पाहिले तर त्यांचा रोख थेटपणे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याकडे जातो. दाभोलकर आणि पानसरे यांनी धर्माच्या नावावर लोकांच्या मनात विद्वेषाच्या भिंती निर्माण करणाऱ्या, धर्माच्या नावावर लोकांची लुबाडणूक आणि शोषण करणाऱ्या शक्तिंविरोधात लढा दिला. पानसरे यांचा लढा अधिक व्यापक आणि जगण्याच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा होता. महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुरामी प्रवृत्तीच्या धोक्यांबाबत ते समाजात जाणीवजागृती करीत होते. हे असे काम करणाऱ्या लोकांच्या वाट्याला काय आले, तर गोळ्या घालून मृत्यू. दोघांच्याही हत्या झाल्यानंतर थोडेच दिवस संशयितांच्या कॅम्पमध्ये शुकशुकाट होता. थोडे दिवस गेल्यानंतर सगळे पुन्हा हालचाल करू लागले. आडून आडून दाभोलकर, पानसरे यांच्यावर टीका करू लागले. पुरोगामी हा शब्द शिवीसारखा वापरू लागले. जातीयवादी आणि धर्मवादी शक्तिंच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना ढोंगी पुरोगामी म्हणू लागले. हत्येच्या आरोपावरून अटक केलेल्यांच्या निषेधार्थ मोर्चे निघू लागले. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे त्यांच्याच विचारांची सत्ता असल्यामुळे हे राष्ट्रवादी विचारांचे लोक रस्त्यावर उतरून खुलेआम संशयित हल्लेखोरांचे समर्थन करू लागले.

संघपरिवारातल्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी ही भाषा वापरली तर समजू शकते. परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्रीच ढोंगी पुरोगाम्यांचा समाचार घेतात, तेव्हा त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे, हे लक्षात येते. राज्याच्या प्रमुखांची वैचारिक दिशा कोणती आहे, हेही स्पष्ट होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नियंत्रणाखालील यंत्रणांकडून नीट तपास होईल, यावर विश्वास कसा ठेवायचा ?

प्रतिगामी शक्तिंचा उन्माद आणि हिंसक कृत्ये देशाने पाहिली आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री ढोंगी पुरोगामित्वाला आव्हान देतात. संघपरिवारातल्या विद्यार्थी संघटनेपुढे जाऊन ढोंगी पुरोगामित्वाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन करतात. मुख्यमंत्र्यांनी फक्त विरोधात उभे राहण्याचेच आवाहन केले. थोडे पुढे जाऊन ढोंगी पुरोगाम्यांना नेस्तनाबूत करा, असे म्हणाले नाहीत, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर त्यांचे उपकारच म्हणावे लागतील.

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts